बीड दि.19 (प्रतिनिधी)-राजकारण करणार्या पुढार्यांच्या मनातही काही गोष्टी रुतून बसलेल्या असतात, त्यांच्याही मनाला काही प्रसंग खूपत असतात, आणि कधी तरी हे सल अचानक बाहेर पडतात, याचाच प्रत्यय शनिवारी आला. जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यातील मंत्री, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांसोबतच आ.विनायक मेटेंचीही उपस्थिती असलेल्या जिल्हा परिषद इमारत लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी राजकीय रंगपंचमी चांगलीच रंगली. अनेकांनी आपल्या मनातले राजकीय सल या निमित्ताने बोलून दाखविले आणि त्याला उत्तर देताना धनंजय मुंडेंनीही ‘जे होते ते भल्यासाठीच’ या थाटात उत्तर दिले.
बीड जिल्हापरिषद इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात शनिवारी जिल्ह्यातील राजकीय नेते एकत्र आले होते. अगदी राष्ट्रवादीतील सर्व आमदारांसोबतच शिवसंग्रामच्या आ. विनायक मेटे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती असल्याने येथून कोणते राजकीय रंग खेळले जातात याची उत्सुकता सर्वांनाच होती. अपेक्षेप्रमाणे आ. आजबे यांनीच त्याची सुरुवात केली. आ.मेटेंना उद्देशून ‘तुम्ही मला त्यावेळी शब्द देऊनही जिल्हा परिषदेत सभापती केले नाही हे बरेच झाले, नाहीतर मी आजही केवळ सभापतीच राहिलो असतो’ असा सल बोलून दाखविला. त्याला आ. विनायक मेटे यांनी काहीही उत्तर दिले नाही , मात्र ‘जिल्हा परिषदेत केवळ पाटीवर नाव लागण्यासाठी काम करू नका, असा टोला त्यांनी बजरंग सोनवणे यांना लगावला. त्याचवेळी धनंजय मुंडे हे धडाकेबाज नेतृत्व असून या जिल्ह्याने त्यांना साथ दिली पाहिजे असेही आ.मेटे म्हणाले. स्टेजवरील अनेक जण विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा सभागृहात येण्यासाठी शुभेच्छा देत होते, आ. मेटेंनी मात्र ‘ते चार’ वगळून इतरांना शुभेच्छा असे वाक्य वापरले. आ. मेटेंच्या भारतीय संग्राम परिषदेचे चारही जिल्हा परिषद सदस्य त्यांचा पक्ष सोडून भाजपवासी झाले, याचा आ. मेटेंना आजही सल असल्याचेच यातून समोर आले.
आ.प्रकाश सोळंके आपल्या जिल्हापरिषदेतल्या आठवणी सांगत असताना ‘आम्ही भाजपमध्ये असताना सभागृहात जाताना 17 होतो, मात्र येताना 34 झालो’ असे म्हणत होते, त्याचवेळी स्टेजवरील साहेबराव दरेकरांनी राज्यमंत्री सत्तारांना ‘त्या 34 साठी मी माझे सदस्य दिले होते, पण आज माझी आठवण कोणी काढीत नाही’ असा सल बोलून दाखविला. आ. सत्तर यांनीही चौफेर फटकेबाजी केली आणि आ.आजबे यांना उद्देशून ‘तुमची सभापती पदाच्या संधी गेली त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‘चकवे साहेब’ होते म्हणून कदाचित तुम्हाला चकवा झाला असेल’ असे सांगत बीड जिल्ह्यात येऊन रावसाहेब दानवेंवर टीका करण्याची संधी मारून नेली.
धनंजय मुंडे यांनीही चौफेर राजकीय फटकेबाजी करीत सर्वांनाच चिमटे घेतले. ‘आ.विनायक मेटेंनी चार लोकांना सोडून इतरांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांची ती इच्छा पूर्ण होईल, मात्र इतर इच्छा सहजासहजी पूर्ण होणार नाहीत असे सांगतानाच त्यांचे सदस्य कुठे गेले माहित नाही, मात्र आ. मेटे हे भाजपचेच आमदार आहेत आणि हे मला माहित आहे’ असे धनंजय मुंडे म्हणाले. ‘मी जिल्हा परिषदेत सदस्य झालो, उपाध्यक्ष झालो ’ असे धनंजय मुंडे म्हणत असतानाच बजरंग सोनवणे यांनी खालून ‘त्यावेळी आम्ही सोबतच होतो’असे सांगितले, मात्र मुंडे यांनी लगेच ‘मात्र कधी अध्यक्ष झालो नाही ’ असे सांगतानाच बजरंग सोनवणेंना उद्देशून ’त्यावेळी मात्र तुम्ही सोबत नव्हते ’ असा चिमटा काढला.त्याला जोडूनच’ मात्र असं असलं , तरी जे होतं ते भल्यासाठीच, असे धनंजय मुंडे म्हणाले. ’जे होतं ते भल्यासाठीच, मी अध्यक्ष झालो नाही म्हणून आमदार झालो, माझं झालं म्हणून संजय दौंड यांचं झालं. आजबे यांना आ. मेटेंनी सभापती केले नाही म्हणून ते आमदार झाले. सोनवणेंचेही होईल, शेवटी जे होतं ते भल्यासाठीच’ असे धनंजय मुंडे म्हणाले. ‘काही जण जिल्हा परिषदेतच रमतात, त्यामुळे ज्यांना पुन्हा येथेच यायचे आहे त्यांना शुभेच्छा’असे सांगतानाच, ‘बजरंग सोनवणे हे आमच्या जनतेच्या मनातील खासदार आहेत, तुम्ही खच खाऊ नका, आपण पुन्हा लढू’असेही धनंजय मुंडे म्हणाले. एकंदरच या कार्यक्रमातील राजकीय रंग आणि अनेकांच्या मनात वर्षानुवर्षे साठलेले राजकीय सल हा चर्चेचा विषय राहिला .