Advertisement

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या नेत्या असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याच्या कर्ज प्रकरणाचा प्रमुख विषय असलेल्या बैठकीकडे शुक्रवारी जिल्हा बँकेच्या भाजपच्याच सदस्यांनी चक्क पाठ फिरविली . अध्यक्षांसह केवळ ५ संचालक ( त्यातही ३ विरोधी गटाचे ) बैठकीला आले,मात्र बैठक तहकूब झाल्याने कारखान्याच्या कर्जावर निर्णय होऊ शकला नाही. नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या विषयावर संचालकांनी घेतलेली ही भूमिका पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वैद्यनाथ कारखान्याच्या कर्ज प्रकरणावर चर्चा होणार होती. चालू गळीत हंगामात वैद्यनाथ कारखाना सुरु करायचा असेल तर कारखान्याला कर्जाची गरज आहे. म्हणूनच कारखान्याने जिल्हा बँकेकडे तब्बल २५ कोटीच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला होता. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा वापरून सरकारकडून १६ कोटीच्या कर्ज रकमेला सरकारची थकहमी मिळवली होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीत वैद्यनाथचे कर्ज प्रकरण मार्गी लागेल असे अपेक्षित होते.
मात्र आजच्या बैठकीला भाजपच्याच संचालकांनी दांडी मारली. अध्यक्ष आदित्य सारडा , ऋषिकेश आडसकर आणि सत्यभामा बांगर या तीन सत्ताधारी सदस्यांव्यतिरिक्त सत्ताधारी आघाडीचा एकही सदस्य बैठकीला आला नाही. दुसरीकडे विरोधी गटाचे चंद्रकांत शेजूळ, भाऊसाहेब नाटकर  , नलावडे हे ३ संचालक कर्ज प्रकरणाला विरोध करण्याच्या तयारीत आले होते. मात्र भाजपच्याच संचालकांनी दांडी मारल्याने बैठकीचे चित्रच पालटले. संचालकच उपस्थित नसल्याने आजची बैठकच होऊ शकली नाही . नेत्याच्या प्रतिष्ठेच्या विषयावरील बैठकीकडे  देखील संचालकांनी पाठ फिरवल्याने पंकजा मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान यापूर्वी सुद्धा एकदा ऐनवेळच्या  विषयात वैद्यनाथच्या कर्जाचा विषय आला होता, मात्र त्यावेळी देखील संचालकांनी या विषयाला ठेंगा दाखविला होता. आता पुन्हा एकदा सत्ताधारी संचालकच वैद्यनाथच्या मार्गातील अडथळा ठरले आहेत.

Advertisement

Advertisement