Advertisement

परंडा (प्रतिनिधी) : प्रभारी गटशिक्षणाधिका-याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ  तालुक्यातील सर्व संघटना प्रतिनिधी व शिक्षकांच्या वतीने दि. ११ रोजी मुकमोर्चा काढुन तहसीलदार, गटविकास अधिकारी  व पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परंडा येथील गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे हे बारावी परीक्षा कामकाजात परिरक्षक म्हणून काम पाहत असताना दि. १० रोजी विस्तार अधिकारी श्रीमती अनिता शिवाजी जगदाळे व त्यांचे पती शिवाजी जगदाळे यांनी खुळे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच यापूर्वीही शिवाजी जगदाळे यांनी वारंवार गटशिक्षण कार्यालयात येऊन गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे व कनिष्ठ सहायक आप्पाराव महानवर व इतर कर्मचारी यांना शिवीगाळ करुन विनयभंगाची धमकी तसेच मारहाण करण्याच्या धमक्या देत होते.श्रीमती जगदाळे यांच्या  पतीमुळे कार्यालयात दहशतीचे वातावरण निमार्ण झाले असून आम्ही सर्व कर्मचारी दडपणात काम करीत आहोत. सदरील घटनेमुळे कार्यालयातील व तालुक्यातील वातावरण गढुळ झाले असून, शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी दहशतीखाली वावरत आहेत. तरी संबंधीताविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढला. संबधित आरोपीवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुक्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शिक्षक संघटनेच्या वतीने पोलिस ठाण्यात निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या संबधितास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली असता  अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सदरील प्रकरणी योग्य तपासणी करून आरोपीस अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
 

Advertisement

Advertisement