मुंबई : पेटीएम बँकेला रिझर्व्ह बँकेने (RBI) जोरदार दणका दिला आहे. पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे. याबाबत आदेशाची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे.
भांडवली बाजारात आयपीओ आणल्यापासून पेटीएम कंपनीच्या अडचणी वाढतच आहे. आता रिझर्व्ह बँकेने दणका दिल्यामुळे पेटीएम बँकेच्या सेवेला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेटीएम पेमेंट बँकेला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवीन ग्राहकांना तात्काळ जोडण्यास थांबवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला गेला आहे. बँकेला तिच्या IT प्रणालीचे सर्वसमावेशक सिस्टम ऑडिट करण्यासाठी आयटी ऑडिट फर्म नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे अधिकृत आदेशात म्हटले आहे. ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही सामग्रीच्या पर्यवेक्षकीय समस्यांवर आधारित आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे.
दरम्यान, याआधीही बँकेला मोठा दंड ठोठावण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट आणि सेटलमेंटच्या कलम 26 (2) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) वर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आता पुन्हा एकदा पेटीएम बँकेला आरबीआने दणका दिला आहे.