बीडः येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँके मागच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नसून बँकेवर रिजर्व्ह बँकेच्या आदेशाने प्रशासक मंडळ नेमण्यात आल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेनेच मंत्री बँकेच्या आर्थिक व्यवहारावरही निर्बंध घातले आहेत. आता द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेतून कोणत्याही खातेदाराला पाच हजारापेक्षा अधिकची रक्कम काढता येणार नाही. हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू राहणार आहेत.
येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेतील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नेमण्यात आल्यानंतर रिजर्व्ह बँकेने कारवाईचे फास अधिक आवळायला सुरूवात केली आहे. बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणात माजी संचालकांवर गुन्हे दाखल झालेले असतानाच आता बँकेच्या आर्थिक व्यवहारावरही देखील रिजर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता खातेदारांना पाच हजारापेक्षा अधिकची रक्कम काढता येणार नाही. तसेच बँकेला रिजर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय कोणत्याही कर्जाचे नुतनीकरण करता येणार नाही, नवीन ठेवी घेता येणार नाही किंवा नवीन कर्जही देता येणार नाही. तब्बल सहा महिन्यासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत.