Advertisement

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक भागात पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस

प्रजापत्र | Wednesday, 09/03/2022
बातमी शेअर करा

उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाने द्राक्षबागासह गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा दिला आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणाच्या बदलामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झाला आहे.

 

अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षाला तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तर तिकडे नाशिकच्यान निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे फळबागा, कांदा आणि गव्हाला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी दुबार पेरणी केली होती. मात्र अवकाळी पावसाने काढणीला आलेले पीक नष्ट झाले आहे.

Advertisement

Advertisement