Sharad Pawar on Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असे शरद पवार यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्या नावाची ही उल्लेख झाल्याने खळबळ उडाली. फडणवीसांच्या आरोपानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार म्हणाले, आरोपांचा काही भाग समजला. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग होते ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य असल्याचे पवार यांनी म्हटले. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असला तरी सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचेही पवार यांनी म्हटले. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.