राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण येथील शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचा तीन दिवसीय नाथषष्ठी यात्रा महोत्सव दोन वर्षांच्या खंडानंतर आयोजित करण्यातल आला आहे. येत्या 23 ते 25 मार्च या तीन दिवसात नाथषष्ठीचा यात्रा महोत्सव रंगणार असून वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे. कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासानाने या वर्षी नाथषष्ठी महोत्सव भरवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीने नाथनगरी भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या भक्तीने फुलून जाणार आहे.
नाथषष्ठी यात्रा काय असते?
पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. या निमित्त दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. तर अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होते. आधी हा सहा दिवसांचा महोत्सव असायचा, यंदा तीन दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने यात सहभागी होतात. नाथषष्ठी यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी नाथवंशांच्या प्रमुख उपस्थितीत दिंड्या आतील नाथ मंदिरातून गोदावरी नदीमार्गे समाधी मंदिरापर्यंत भजन करीत जातात. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात येते. तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सायंकाळी नाथवंशजांच्या हस्ते काला दहिहंडी फोडून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची सांगता केली जाते.
व्यावसायिकांत आनंद, प्रशासन सज्ज
यात्रेच्या निमित्ताने विविध भागांतील वारकरी पायी दिंडीने नाथनगरीत दाखल होऊन भजन, कीर्तन, प्रवचन, गवळण आदी धार्मिक कार्यक्रमात लीन होतात. तसेच यात्रेत कुंकू, बुक्का, धार्मिक पुस्तके, प्रसाद खेळणी, मृदुंग, वाद्य दुकानदार यांचेही दुकाने थाटले जातात. त्यामुळे व्यावयासिकांमध्ये आनंद आहे. तर महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, गोदावरी नदी वाळवंट साफसफाई, शहरातील स्वच्छता व इतर सुविधा देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.