पंजाबमधील अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॅम्पवर एका जवानाने गोळीबार केला आहे. या गोळीबारात बीएसएफचे चार जवान ठार झाले असून एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या जवानाचाही मृत्यू झाला आहे.
बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान घडली आहे. कॉन्स्टेबल एस. सातेप्पा याने आपल्या सर्व्हिस रायफलने जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. यात आरोपी सातेप्पाचाही मृत्यू झाला आहे.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील अटारी-वाघा सीमा चौकीपासून 12-13 किमी अंतरावर खासा भागातील 144 व्या बटालियनच्या आवारात ही घटना घडली असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सातेप्पा हा त्याच्या कामाच्या वेळेबद्दल रागावला होता. रागाच्या भरात त्याने कमांडिंग ऑफिसरच्या वाहनावर गोळीबार केला. यात चार बीएसएफ जवानांचा मृत्यू झाला. गोळीबारात जखमी झालेल्या सहाव्या जवानाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल दर्जाच्या जवानांचा समावेश आहे. याप्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.