Advertisement

आयपीएलचे बिगुल वाजले

प्रजापत्र | Sunday, 06/03/2022
बातमी शेअर करा

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते. पण आता संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत. 

 

 

आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत सामन्यांबाबत आणि ग्रुपबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत जाहीर केलं आहे. आयपीएल 2022 चा शुभारंभ मुंबई नगरीतून होणार असून वानखेडे मैदानावर पहिला सामना सीएसके विरुद्ध केकेआर यांच्यात शनिवार 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. 

 

आयपीएल 2022
आयपीएल 2022 हा 15 वा हंगाम भारतामध्ये कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानावर 20, ब्रेबॉन मैदानावर 15, डीवाय पाटील मैदानावर 20 आणि पुण्यातील मैदानावर 15 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला समान संधी मिळेल यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, प्रत्येक संघाचे चार चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअम या मैदानावर होणार आहे. तर प्रत्येक संघाचे तीन तीन सामने ब्रेबॉन आणि पुणे मैदानावर होणार आहेत. प्रत्येक संघ लीग स्टेजमध्ये 14 सामने खेळणार आहे. त्यामध्ये पाच संघाविरोधात प्रत्येक संघाला दोन तर चार संघाविरोधात एक एक सामना खेळावा लागणार आहे.

 

 

प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर चार संघाविरोधात प्रत्येकी दोन सामने खेळेल. तसेच दुसऱ्या ग्रुपमधील एका संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  तर दुसऱ्या ग्रुपमधील इतर संघाबरोबर प्रत्येकी एक एक सामना खेळावा लागेल. उदा. ग्रुप अ मध्ये मुंबई  कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ब ग्रुपमधील चेन्नई संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.  ब ग्रुपमधील इतर संघाविरोधात मुंबई प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये आरसीबीचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ग्रुप अ मधील राजस्थान संघाविरोधात दोन सामने खेळेल अन् इतर संघाविरोधात प्रत्येकी एक एक सामना खेळणार आहे.

 

Advertisement

Advertisement