Advertisement

‘झूंड’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप?

प्रजापत्र | Saturday, 05/03/2022
बातमी शेअर करा

नागराज मंजुळेंच्या झूंडची सगळीकडे चर्चा आहे. अर्थातच त्याला वेगवेगळी कारणं आहेत. एक तर सैराटनंतर नागराज कडून वाढलेल्या अपेक्षा, बिग बीचं सिनेमात असणं, आमिर खाननं केलेली स्तुती, कोरोनानंतर रिलिज होणारी बडे परदे पर बडी फिल्म असं झालेलं प्रमोशन. अनेक कारणं आहेत. पण झूंडची जेवढी चर्चा होतेय आणि जेवढं कौतूक होतंय त्या तुलनेत प्रेक्षक मात्र सिनेमाला मिळताना दिसत नाहीयत. कारण शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात रिलिज झालेला झूंड बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालाय की काय अशी चर्चा सुरु झालीय. कारण पहिल्या दिवशी जेवढी कमाई अपेक्षीत होती ती झालेली नाही. शुक्रवारचे आकडे समोर आलेत आणि कमाईचे हे आकडे फक्त नागराजच नाही तर त्याचं जे एक स्वतंत्र फॅन फॉलोईंग तयार झालंय त्यांचीही निराशा करणारं आहे.

 

नेमकी किती कमाई झाली?
झूंड फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर रिलिज झालाय. सिनेमाचा पहिला दिवस हा महत्वाचा असतो. बॉक्स ऑफिसवर तो काय कमाल करतो याकडे सर्वांचच लक्ष असतं. झूंडची शुक्रवारी कमाई मात्र नगण्य राहीलीय. फिल्म परिक्षक तरण आदर्शनं कमाईचे आकडे ट्विट केलेत. आणि त्यात झूंडनं पहिल्या दिवशी फक्त दीड कोटीचा गल्ला जमवल्याचं म्हटलंय. दीड कोटीचा गल्ला, तोही त्या सिनेमाचा ज्यात अमिताभ बच्चन नायक आहे, नागराज मंजुळे, टी सिरीजसारखी अशी तगडी नावं आहेत, त्याप्रमाणात एकदम थंड मानला जातोय. पण झूंडला माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळण्याची चिन्हं वर्तवली जातायत. कारण झूंड बघून बाहेर पडलेला प्रेक्षक नागराजच्या झूंडच्या प्रेमात आहे. जो जिथं जातोय तिथं त्याची स्तुती करतोय. सोशल मीडियावरही तो व्यक्त होतोय. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी झूंडच्या गल्ल्यात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. निर्मात्यांनाही तशीच अपेक्षा असावी. पण आपल्याकडे शुक्रवारी सिनेमा रिलिज होतो, त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस कुठल्याही सिनेमाच्या कमाईच्या दृष्टीनं महत्वाची आहेत.

Advertisement

Advertisement