Advertisement

रब्बी पिकं पाण्यात जाण्याची भीती

प्रजापत्र | Saturday, 05/03/2022
बातमी शेअर करा

रब्बी हंगामातील गहु, तूर, हरभरा या पिकांची काढणी सुरू असताना व राज्यातील बहुतांश भागात आब्यांला मोहोर आलेला असतानाच हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी 7 मार्च रोजी औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

 

 

रब्बी हंगामातील पिके हाताशी आलेला असताना व अनेक भागांत पिकांची काढणी अद्याप झालेली नसल्याने या पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा धास्तावला आहे.

 

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
हवामान विभागाने मंगळवारी व बुधवारीदेखील या भागांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय पालघर, पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, या भागांत तुरळक पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत हे क्षेत्र तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

 

रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती
मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांसह कोकणातही पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उसदेखील कारखान्यांनी अद्याप तोडलेला नाही. त्यातच आता या अवकाळी पावसामुळे हा ऊसदेखील पाण्यात जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

Advertisement

Advertisement