Advertisement

विहिरीत आढळले आईसह तीन मुलांचे मृतदेह

प्रजापत्र | Friday, 04/03/2022
बातमी शेअर करा

विहिरीत आईसह तीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात पठार भागात कोठे खुर्द गावात शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची घारगाव पोलिसां ना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत चारही मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह शवविच्छेदना (Postmortem)साठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये आई, दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. स्वाती ढोकरे (28 वर्ष), भाग्यश्री ढोकरे (5 वर्ष), तन्वी ढोकरे (साडेतीन वर्षे) आणि चिमुकला मुलगा शिवम (सहा महिने) अशी मयतांची नावे आहेत. 

 

काय आहे नेमके प्रकरण ?

कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे हे आपल्या पत्नी, तीन मुले, आई, वडिल यांच्यासह राहत होते. ढोकरे कुटुंबीय शेतकरी आहे. बाळासाहेब ढोकरे हे आपल्या आईसह एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. तर बाळासाहेबांचे वडिल घराजवळच असलेल्या शेतात काम करीत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान मयत महिला स्वाती ढेकरे हिने सासऱ्यांना शेतावर प्यायला पाणी नेऊन दिले आणि ती पुन्हा घरी आली. त्यानंतर बराच कालावधी उलटला मुलं बाहेर खेळताना दिसली नाही. मुलांचा आरडाओरडाही ऐकून येत नव्हता. म्हणून महिलेचे सासरे घरी  मुले कुठे गेली हे पहायला आले.

मात्र घरात सूनबाई, मुले कुणीही दिसली नाहीत. सासऱ्यांनी घराच्या आजूबाजूलाही शोध घेतला. मात्र हे चौघेही कुठेच दिसेनात म्हणून सासरे शोधत शोधत घराच्या जवळच असलेल्या विहिरीजवळ गेले. तेथे विहिरीजवळ त्यांना या चौघांच्या चपला दिसल्या. त्यामुळे सासऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी जवळच शेतावर काम करत असलेल्या आपल्या चुलत भावाला हाका मारल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून इतर लोकही धावत आले. त्यानंतर त्यांनी सूनबाई आणि मुलं कुठेही दिसत नसल्याचे सर्वांना सांगितले. मात्र त्यांच्या चपला विहिरीजवळ पाहून सर्वांनी त्यांचा विहिरीत शोध घेतला असता चारही मृतदेह विहिरीत आढळले.

 

घातपात की आत्महत्या ?

दरम्यान तात्काळ या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी घारगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Advertisement

Advertisement