बीड : शहरातील तेलगाव रस्त्यावरील मोहमदिया कॉलनी येथे विद्युत तार तुटून घरावर पडल्याने स्पार्किंगच्या ठिणग्या उडून चार घरांना आग लागली. लोकांच्या प्रसंगावधानामुळे तातडीने वीजपुरवठा बंद करुन घरातील पाण्याने आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली परंतु तरीही चार घरांना आग लागली होती. यातील एका घरातील रोख रक्कम, दागिने व आदि साहित्य जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी ॲड. शफिक भाऊ यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर महावितरण कंपनीचे अभियंता उमेश कसबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.
मोहमदीया कॉलनी येथून ३३ के.व्ही. केंद्राची वीज वाहिनी जाते. गुरुवारी ( दि. ३ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास स्पार्किंग होऊन तार तुटून घरांवर पडली. पडली तेव्हाही त्यात वीज प्रवाह सुरू होता. घरांवर पत्रे असल्याने तार पडताच आगीच्या मोठ्या ठिणग्या उडाल्या यामुळे शेख आमेर, शेख हबीब वहाब, महेबुब बेग, शेरखान या चार जणांच्या घरांना आग लागली. हे पहातच उपस्थितांनी फोन करुन माहिती देऊन वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. वीज पुरवठा बंद होताच प्रत्येकाने आपल्या घरातील पाण्याने आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही शेख आमेर यांच्या घराला आगीचा विळखा पडल्याने घरातील कपाट, त्यातील रोख ३५ हजार रु. दागिने, पलंग,शोकेस असे आदी साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. इतरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शफिक भाऊ यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसान ग्रस्तांना दिलासा दिला. संबंधित यंत्रणेला फोन करुन माहिती दिली. माहिती मिळताच महावितरण कंपनीचे उमेश कसबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली. सध्या पंचनामा सुरू आहे. या घटनेत नेमकं आर्थिक नुकसान किती झाले व काय साहित्य जळाले हे पंचनामा पुर्ण झाल्यानंतर समोर येईल. उन्हाळा सुरू झाला असून, या काळात आगीच्या घटना वाढतात त्यामुळे नागरिकांनी अधिक जागरूक रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.