युद्धग्रस्त युक्रेनमधून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. विद्यार्थ्याला स्ट्रोक आला आणि तो बराच काळ रुग्णालयात होता, अशी माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंदन जिंदाल नावाचा २२ वर्षीय विद्यार्थी विनितसिया नॅशनल पायरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तो मूळचा पंजाबचा होता. चंदनला इस्केमिक स्ट्रोक आला होता आणि त्याला विनितसिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहून चंदनचा मृतदेह भारतात परत आणण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव्ह शहर सोडण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत खार्किव्ह शहर सोडून पेसोचिन, बाबे आणि बेझल्युडोव्हका वसाहतींमध्ये पोहोचावं, असं भारतीय दूतावासाने म्हटलंय.
मंगळवारी खार्किव्ह शहरात झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २४ तासांत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. भारत सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.