कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादातून दोघा सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले. आरोपींनी दोघा भावांवर चाकूने सपासप वार केले होते. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या भावंडांचा मृत्यू झाला. नांदेड शहरात ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये वाद झाला होता. या वादाचं रूपांतर चाकू हल्ल्यात झालं . 35 वर्षीय प्रफुल्ल राजभोज आणि 33 वर्षीय संतोष राजभोज अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावं आहेत. अन्य दोघं जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेड शहरातील देगाव चाळ भागात हा थरार आज (बुधवारी) सकाळी घडला.
भावकीत भांडण, वादातून हाणामारी
घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून भावकीमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भांडणात 35 वर्षीय प्रफुल्ल राजभोज आणि 33 वर्षीय संतोष राजभोज या दोघा भावांवर आरोपींनी चाकूने गंभीर वार केले. यात प्रफुल्ल आणि संतोष दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी 7 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यापैकी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
                                    
                                
                                
                              
