विद्यापीठाच्या घोळामुळे विद्यार्थी गोंधळात
बीड : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आग्रही भूमिकेनंतर विद्यापीठाच्या परिक्षा सुरु झाल्या मात्र या परीक्षेचे ग्रहण काही संपण्याचे चित्र दिसत नाहीये.विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे प्रवेशपत्र देण्यात आले असून परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीने द्यावा लागत आहेत.विद्यापीठाच्या या घोळामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षेपासून वंचित राहत राहिल्याचे देखील चित्र आहे.
विद्यापीठांच्या पुनर्परिक्षार्थींच्या परिक्षांना सध्या सुरुवात झाली आहे.तत्पूर्वी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने द्यायच्या या संदर्भात विचारणा करण्यात आली.अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनचा पर्याय निवडला.मात्र प्रवेश पत्रासाठी जेंव्हा महाविद्यालयात विद्यार्थी गेले तेंव्हा अनेकांना प्रवेश पत्र मिळालेच नाही.तर ज्यांना मिळाले त्यातील अनेकांना प्रवेश पत्रावर उल्लेख ऑनलाईनचा मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने देण्याचे सांगण्यात आले.एकंदरीत काय तर विद्यापीठाच्या घोळामुळे विद्यार्थी गोंधळात असून अनेक जण या प्रकारामुळे गोंधळात आहेत.
परीक्षेची वेळीही निश्चित नाही
दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा गोंधळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे.ऑनलाईन प्रवेश पत्रावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना नेमके परीक्षेसाठी कधी यायचे याचीच कल्पना नाही.जे प्रवेशपत्र मिळाले आहे त्यावर दोन सत्राच्या वेळा देण्यात आल्या असून पहिले सत्र सकाळचे आहे.ज्यात सकाळी ९ ते दुपारी ३ आणि दुसरे सत्र दुपारी २ ते रात्री ८ पर्यंतचे देण्यात आले.मात्र प्रत्यक्षात ऑनलाईन परीक्षा तर दूरच राहिली ऑफलाईनच्या वेळा सुद्धा विद्यार्थ्यांना माहित नसल्याने सकाळी ९ पासून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर गर्दी करू लागले आहेत.
मग त्या विद्यार्थ्यांचे काय होणार ?
ऑनलाईन परीक्षेच्या गोंधळात सध्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो प्रश्न सतावत आहे तो म्हणजे ऑनलाईन परीक्षा असताना ऑफलाईन दिल्याने आपला निकाल कोणत्या पद्धतीने लागणार? परीक्षेचा अर्ज ऑनलाईन असताना ऑफलाईन परीक्षा तेही प्रवेशपत्र नसताना आपण देतोय,मग आपले काय होणार याची भीती आज अनेक विद्यार्थी बोलवून दाखवत आहेत.
निसंकोच परीक्षा द्या,शैक्षणिक नुकसान होणार नाही
सध्या प्रवेशपत्रक नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.मात्र असे असले तरी गोंधळून जाण्याचे काही कारण नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.विद्यापीठाने महाविद्यालयांना परीक्षा संदर्भात विशेष सूचना केल्या आहेत.विद्यार्थी कुठल्याही जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देऊ शकतो.त्या विद्यार्थ्यांला प्रश्न आणि उत्तरपत्रिका उपल्बध करून देणे महाविद्यालयाचे कर्तव्य आहे.परीक्षार्थीने कोणत्या केंद्रावर परीक्षा दिली तरी त्याची उत्तरपत्रिका ही विद्यापीठाकडे पाठविण्यासंदर्भात जे पत्र लागते ते महाविद्यालय प्रशासन तात्काळ देते.त्यामुळे परीक्षांबाबत संभ्रम नको,प्रवेशपत्र नसले तरी निसंकोच परीक्षा द्या शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.बाकी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासन दक्ष आहे.
नामदेव सानप (प्राचार्य,वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय,बीड)