Advertisement

डॉ.भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागरांवर गुन्हा दाखल

प्रजापत्र | Friday, 25/02/2022
बातमी शेअर करा

बीड : खाजगी जमिनीच्या वादातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात शुक्रवारी भरदिवसा गोळीबार झाला, यात दोन जण जखमी झाले. घटनेनंतर स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जमिनीच्या वादातून झालेल्या या प्रकारात रात्री उशीरा बीडमधील राजकीय दिग्गजांविरोधात  प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी सकाळी येथील रजिस्ट्री कार्यालयात नियमित कामकाज सुरु असतानाच सकाळी ११ च्या सुमारास एका जागेच्या व्यवहाराच्या नोंदणीवरून गोंधळ झाला आणि त्यावेळी चक्क गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. यात संतोष  क्षीरसागर आणि फारूक सिद्दीकी हे दोघे जखमी झाले. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली. रजिस्ट्री कार्यालयाचे कामकाज लगेच बंद झाले.घटनेचे गांभीर्य मोठे असल्याने लगेच स्वतः जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि सारेच अधिकारी घटना स्थळी गेले. घटनास्थळावरून लाकडी दांडे , एक गोळी आणि आणखी काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. रात्री उशीरा या प्रकरणात जखमी संतोष क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
--
जखमी औरंगाबादला
या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना सुरुवातीला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र दुपारनंतर त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
---
कॅमेरे आहेत, पण हार्ड डिस्क नाही
रजिस्ट्री कार्यालय हे बीड जिल्ह्यातील एक प्रमुख सरकारी कार्यालय आहे. याठिकाणी रोज कोट्यवधींचे व्यवहार होत असतात . सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये सध्या सीसीटीव्ही करण्यात आलेली आहे. त्यानुसार येथील रजिस्ट्री कार्यालयातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र आज गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या कार्यालयातील फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हार्डडिस्कच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
---
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
फिर्यादी संतोष बबन क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन
भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार व इतरांविरुध्द
तलवार, लाठी कथता, दोन पिस्टल, दांडे याद्वारे जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.आठ दिवसापूर्वी भारतभूषण व योगेश क्षीरसागर यांनी संतोष यांना बंगल्यावर आले तेव्हा जास्त हवेत उडू नका, फडफड करू नका असे म्हणत बघून घेऊ अशी धमकी दिली होती. तसेच शुक्रवार कलेक्टर ऑफिसकडे जात असताना फारुक सिद्दीकी, संतोष क्षीरसागर व हेमंत क्षीरसागर हे जात असताना वरील आरोपींनी आवाज देऊन थांबले त्यानंतर वादावादी होऊन हल्ला केला असे फिर्यादित म्हटले आहे
---
----------------------

Advertisement

Advertisement