Advertisement

राज्यपालांना 'ठाकरी' टोला

प्रजापत्र | Wednesday, 14/10/2020
बातमी शेअर करा

बीड : मुख्यमंत्री असो व राज्यपाल, ही पदे संवैधानिक असतात. या पदावर येताना शपथ घ्यावी लागते ती संवैधानिक मूल्ये जपण्याची. आणि धर्मनिरपेक्षता हे देखील एक संवैधानिक मूल्यच आहे. त्यामुळे एखादा राज्यपाल जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष कधीपासून झाले अशी विचारणा करतो त्यावेळी त्या राज्यपालाने आपल्या शपथेशी केलेला तो व्याभिचार  असतो. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून हा जो नैतिक व्याभिचार केला त्याला ठाकरी भाषेतच उत्तर देणे गरजेचे होते. ते उद्धव ठाकरेंनी दिले, याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. नाहीतरी संत तुकारामांनी देखील अशा प्रवृत्तींबद्दल ’ विंचू पिंडीवरी बैसला, देवपूजा नावडे त्याला...हे सांगून ठेवले आहेच.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मागच्या काही दिवसांपासून जे काही सुरु आहे, ते पाहिले तर संत तुकाराम महाराजांच्या ‘वचू पिंडीवरी बैसला’ या अभंगाची आठवण व्हावी असेच आहे. राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार या राज्यपाल महोदयांना आवडलेले नाही. आणि या सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल महोदयातील ‘संघी राजकारणी’ सरकारच्या मार्गात पेरता येतील तितके काटे पेरत आहे. राज्यपाल हे जरी राज्याचे घटनात्मक प्रमुख असले तरी राज्याचे कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतात , आणि मुख्यमंत्री म्हणा किंवा सरकार म्हणा, हे जनतेला उत्तरदायी असतात . राज्यपालांचे असे कोणते उत्तरदायित्व नसते . त्यामुळे ज्यांचे कोणतेच उत्तरदायित्व नाही, त्यांनी कसे वागावे याचे काही संकेत असतात . ते संकेत पाळले गेले तर त्या पदाची प्रतिष्ठा राहत असते . मात्र हे संकेत कोश्यारी सातत्याने धुडकावत आले आहेत.
कोरोनाच्या संदर्भाने राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘हिंदुत्वाची’ आठवण करून द्यावी आणि त्यांच्या ’धर्मनिरपेक्षते’बद्दल आक्षेप घ्यावेत हे राज्यपालपदाला शोभणारे नव्हते. धर्मनिरपेक्षता हे संवैधानिक मूल्य आहे. त्याचे पालन करण्याची शपथ जशी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे तशीच राज्यपालांनी देखील घेतली आहे, मात्र स्वतः शपथभ्रष्ट झालेले कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील तसेच व्हावे अशी अपेक्षा करतात, हा त्यांच्यावरच्या संस्कारांचा भाग असेलही कदाचित , पण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. हिंदुत्व केवळ मंदिरात आणि भावना भडकावण्यात शोधून त्याचे राजकारण करण्याचेच ‘बौद्धिक ’ ज्यांना मिळालेले आहे, त्या कोश्यारींकडून वेगळी अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या विचारधारेवर अन्याय करण्यासारखे होईल, त्यामुळे  त्यांच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर जास्त अभिनंदनीय आहे. खरे हिंदुत्व काय असते ,  ‘धर्मांची देवळे आणि देवळांचा धर्म ’ काय असतो हे सांगणार्‍या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे  नातू आहेत , त्यामुळेच महाराष्ट्राला बदनाम करणारांसाठी जे पायघड्या टाकत होते, आणि जे अशा कठीण काळातही धार्मिक द्वेषाच्या नांग्या मारू पाहत आहेत , अशांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानंी सनसनीत ‘ठाकरी’ चपराक लगावली आहे

Advertisement

Advertisement