सध्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशियाने युद्ध घोषीत केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये बीड जिह्यातील एक विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनिकेत भाऊसाहेब लटपटे (वय 20) असे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता. खारक्यू नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, खारक्यू, युक्रेन अंतर्गत प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्याठिकाणी युद्धाची घोषणा झाल्याने तो अडकला असून संपर्कात नसल्याची माहिती त्याचे वडील भाऊसाहेब लटपटे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभय जोशी यांच्याकडे दिली आहे. याबाबतची नोंद घेऊन विभागीय आयुक्तालयातील आपत्ती विभागास कळविले असून केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत संपर्क करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे .