गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेनचा वाद आता युद्धात बदलला आहे. रशियाने पहाटे 5 वाजल्यापासूनच युक्रेनच्या राजधानीवर बॉम्बगोळे टाकण्यास सुरुवात केली. हवाई हल्ल्यांनी राजधानी कीव्ह आणि इतर परिसर दणाणून उठले. परिणामी युक्रेनने सुद्धा जबाबी हल्ले करून रशियाचे एक लढाऊ विमान हाणून पाडले.
जगाने रशियाला थांबवण्याची हीच वेळ! -युक्रेन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगाला आधीच धमकावले आहे की कुणीही युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. यानंतर युक्रेन सरकारने जगाला मदतीचे आवाहन केले. आमच्यावर तिन्ही बाजूंनी रशियाचे हवाई हल्ले सुरू आहेत. तरीही आम्ही झुकणार नाही. प्रत्येक हल्ल्याला उत्तर देऊ. जगाने रशियाला उत्तर देण्याची आणि थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. असे युक्रेन सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील -पुतिन
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे अशा शब्दांत नाटो आणि अमेरिकेला धमकावले आहे. युक्रेन काबिज करण्याचा आमचा हेतू नाही. तसेच नागरिकांना सुद्धा लक्ष्य केले जात नाही. युक्रेनच्या सैनिकांनी माघार घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या विधानानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट झाले. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. तर 2 लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क भागात राहणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांनी या भागात स्फोट झाल्याची माहिती दिली.
शांततेचे आवाहन
संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. फ्रान्सने बुधवारी आपल्या नागरिकांना विलंब न करता युक्रेन सोडण्यास सांगितले. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य गोळा झाल्यामुळे गंभीर तणाव निर्माण झाला आहे. तसेच, दोन फुटीरतावादी प्रदेशांना रशियाने मान्यता दिली. युक्रेनने आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे युक्रेनमधील फ्रेंच नागरिकांनी विलंब न करता देश सोडायला हवा.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या बैठकीत रशिया-युक्रेन संकट, इंडो-पॅसिफिकमधील परस्पर सहकार्य, भारत आणि फ्रान्समधील राजकीय, आर्थिक आणि संरक्षण संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. पूर्व युरोपमधील तणाव कमी करण्यासाठी मॅक्रॉनच्या प्रयत्नांचे भारताने कौतुक केले. फ्रेंच इंटरनॅशनल रिलेशन्स संस्थेत बोलताना जयशंकर यांनी फ्रान्सचे कौतुक केले आणि त्याला जागतिक महासत्ता म्हटले.
आणीबाणीची घोषणा
रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या संसदेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. आणीबाणीच्या घोषणेसह, युक्रेनने आपल्या 30 लाख लोकांना त्वरित रशिया सोडण्यास सांगितले आहे. रशियाने बुधवारी युक्रेनच्या बँकांवर आणि संरक्षण, परराष्ट्र, अंतर्गत सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या वेबसाइटवर सायबर हल्ले केले. उपपंतप्रधान फेडोरोव्ह म्हणाले की, रशियाला चोख प्रत्युत्तर देऊ.