Advertisement

उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन

प्रजापत्र | Wednesday, 23/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून  ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी  मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

 

 

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लडेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असं नवाब मलिक यांनी म्हटलं. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास मुंबईतील मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडी पक्षाचे मंत्री, आमदार धरणे आंदोलनाला बसणार आहेत. तसंच शुक्रवारपासून राज्यभरात शांततेत आंदोलन केलं जाणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. 

 

 

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. न्यायालयात दोषी आढळल्याशिवाय राजीनामा न घेण्याचं ठरविल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मलिक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असल्याने त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याचं राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता त्यावेळचे हे प्रकरण असून फक्त मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं छगन भुजबळ म्हणाले. 

 

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement