मुंबई-नवाब मलिक हे केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांविषयी परखडपणे बोलत असतात. त्यामुळे त्यांच्यावर आज किंवा उद्या अशी करावाई होणार, याची आम्हाला खात्रीच होती, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
पवार म्हणाले,यामध्ये काहीच नवीन नाही. यंत्रणेचा गैरवापर करून आज किंवा उद्या हे घडणारच होतं. नवाब मलिक यांना काहीतरी प्रकरण काढून लक्ष्य केले जाणार, हे आम्हाला माहिती होते, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच ईडीकडे नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. कसले पुरावे, कसली केस काढली माहिती नाही. एखादा मुस्लीम कार्यकर्ता असला की, काही झालं तरी दाऊदचं नाव काढलं जातं आणि कनेक्शन जोडलं जातं. माझ्यावरही २५ वर्षांपूर्वी असे आरोप झाले होते. आतादेखील अशाचप्रकारे लोकांना बदनाम केले जात आहे. जे लोक केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांविरोधात स्वच्छपणे भूमिका मांडतात, त्यांना लक्ष्य केले जाते, असेही शरद पवार यांनी सांगितले.
चौकट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची 'ईडी'कडून (ED) अचानकपणे चौकशी सुरु झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी बळजबरीने नवाब मलिक यांना त्यांच्या घरातून उचलून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीसाठी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेण्यात आले आहे. येथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काही अंतरावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना याठिकाणी जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून यासंदर्भात भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांची मुलगी काहीवेळापूर्वीच त्यांच्या घरी दाखल झाली आहे. तसेच नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही जमले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.