बीड : जिल्हयात देवस्थान आणि वक्फच्या जमिनी हडपल्याचे नवनविन प्रकार समोर येऊ लागले आहेत. यातच बीडमधील सारंगपूरा मस्जिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याचा प्रकार समोर आला असून यात बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह भूमाफिया आणि महसुलच्या कर्मचार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा वक्फ अधिकारी अमिनुज्जमा यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात वक्फच्या जमीनी मोठ्या प्रमाणावर असून त्या भलत्यांनीच ढापल्या आहेत. महसुल प्रशासन आणि मुतवल्ली यांच्याशी मिलीभगत करत भूमाफियांनी या जमिनी पदरात पाडून घेतल्या आहेत. बीड शहरातील सारंगपूरा मस्जिदीच्या नावे असलेल्या 25 एकर 38 गुंठे जमिनीला इनामदार रोशनअली यांनी 99 वर्षांची लिज केल्याचे दाखवत दिनकर गिराम यांच्या नावे फेरफार घेण्यात आला होता. सदर फेरफार रद्द करुन वक्फ बोर्डाला ताबा द्यावा अशी वक्फ बोर्डाने अनेकदा विनंती करुनदेखील ते फेरफार रद्द झाले नाहीत. उलट तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याने बेकायदेशीरपणे सदर जमिन खाजगी व्यक्तींच्या नावे खालसा केली. या प्रकरणात आता बडतर्फ करण्यात आलेला उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह इतर भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
आरोपींमध्ये बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडूळे, उध्दव धपाटे, तत्कालीन मंडळ अधिकारी पी.के.राख आणि तलाठी तांदळे यांचा समावेश आहे.