Advertisement

धारुर किल्ल्यातील तोफ गोळे गायब

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.२१ (वार्ताहर) - धारूर   येथील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवप्रेमींनी रविवारी गड स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी मात्र किल्ल्यातील अनेक दगडी तोफ गोळे गायब असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला.

रविवार रोजी सह्याद्री प्रतिष्ठान बीड, युथ क्लब, सकल मराठा समाज धारूर, कायाकल्प फाउंडेशन, पत्रकार संघ  या सामाजिक संघटनेच्या वतीने येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. यावेळी किल्ल्यातील आतील व बाहेरील बाजुस वाढलेल्या बाभळी तोडून कचरा गोळा करण्यात आला.

 

यावेळी धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यातील  एका खोलीत ठेवलेले पंधरा दगडी तोफगोळे चोरीला गेले असल्याचे स्थानिक शिवप्रेमी व पत्रकारांच्या निदर्शनास आले. यावेळी पुरातत्व विभागाकडे  विचारलं असता समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. याकडे प्रशासन, पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याने शिवप्रेमी मध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐतिहासिक किल्ल्यातील तोफगोळ्यांचा शोध लावा नसता मोठे आंदोलन करू असा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान व धारूर येथील सामाजिक संस्थेने दिला आहे.
                  
ऐतिहासिक किल्ला आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत डोलाने उभा आहे. या किल्ल्यामध्ये सातत्याने शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते. येथील कायाकल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने सलग २५ रविवार काम करत खारी दिंडी या तलावाची भिंत स्वच्छ केली. तर युथ क्लबने सलग महास्वच्छता अभियान राबवले.

 

काल रविवार रोजी शिवजयंतीचे औचित्य साधत बीड   येथील सह्याद्री प्रतिष्ठान तसेच धारूर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सकल मराठा समाज, कायाकल्प फाऊंडेशन व युथ क्लब या सामाजिक संघटनांच्या वतीने येथील किल्ल्यामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. २००३ मध्ये या किल्ल्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेण्यात आले होते. याकाळात केलेल्या स्वच्छता मोहिमेतही काही तोफ गोळे  मिळून आले होते.

 

याच काळात नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या शहरातील बारवांच्या गाळ उपसा मोहिमेत जुन्या तलवारी, एक पिस्तूल मिळून आले होते. तसेच येथील धारेश्वर मंदिराच्या कामात अनेक जैन मुर्त्या आढळून आल्या होत्या. हा सर्व अनमोल ठेवा एका संग्रहालयात जतन करुन ठेवण्याची गरज असताना याचा ठावठिकाणाच सापडत नाही. यामुळे आता पुरातत्व खात्याकडे संग्रहालय उभारण्याची मागणी शिवप्रेमीतून होत आहे

Advertisement

Advertisement