Advertisement

लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

प्रजापत्र | Monday, 21/02/2022
बातमी शेअर करा

राष्ट्रीय जनता दलाचे  अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड ठोठावण्यात आला आहे. 

आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे. 

 

दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी 

139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. आज यापैकी 38 जणांना शिक्षा होणार आहे. अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ज्या 38 जणांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे, त्यापैकी 35 जण बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. तर लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

काय आहे दोरंडा प्रकरण?

1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. आज या प्रकरणातील 38 दोषींच्या शिक्षेवर सुनावणी पार पडणार आहे. 

Advertisement

Advertisement