Advertisement

वऱ्हाड घेऊन जाणारी कार नदीत कोसळली

प्रजापत्र | Sunday, 20/02/2022
बातमी शेअर करा

 लग्न समारंभानंतर घरी जाणारी वऱ्हाडाची गाडी नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नवरदेवासह नऊ जणांना प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंबळमध्ये शनिवारी रात्री उशिरा हा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका छोट्या पुलावरुन ही कार नदीत पडल्याची माहिती आहे. चौथ का बरवारा भागातून ही कार कोटा येथे आली होती, तिथून रात्रीच्या सुमारास परत जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

नेमकं काय घडलं?
अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा आणि स्थानिकांचा जमाव गोळा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

 

लोकसभा अध्यक्षांकडून शोक व्यक्त
दुसरीकडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बिर्ला म्हणाले की, या दुर्दैवी अपघातात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी काळजाला घरं पाडत आहे. त्यांच्या अकाली निधनाने मला अतीव दुःख झालं. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.

Advertisement

Advertisement