अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी रोजी सिटी सिव्हिल कोर्टाने 78 पैकी 49 आरोपींना UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत दोषी ठरवले होते. अयाज सय्यद या दोषींपैकी एकाला तपासात मदत केल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. याशिवाय 29 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एक लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्यात येतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.
70 मिनिटांत झाले होते 21 स्फोट
26 जुलै 2008 हा तो दिवस होता जेव्हा 70 मिनिटांच्या कालावधीत 21 बॉम्बस्फोटांनी अहमदाबादचा आत्मा हादरला होता. शहरात झालेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला, तर 200 लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटांचा तपास अनेक वर्षे चालला आणि सुमारे 80 आरोपींवर खटला चालवण्यात आला. पोलिसांनी अहमदाबादमध्ये 20 एफआयआर नोंदवले होते, तर सुरतमध्ये आणखी 15 एफआयआर नोंदवण्यात आले होते, जिथे विविध ठिकाणांहून जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आले होते.
29 बॉम्बचा स्फोट होऊ शकला नाही
स्फोटांनंतर, गुजरातच्या सुरत पोलिसांनी 28 जुलै ते 31 जुलै 2008 दरम्यान शहरातील विविध भागांतून 29 बॉम्ब जप्त केले होते. ज्यामध्ये 17 वराछा परिसरातून आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटरमुळे या बॉम्बचा स्फोट होऊ शकला नसल्याचे तपासात समोर आले होते.
गोध्रा घटनेला प्रत्युत्तर म्हणून बॉम्बस्फोट करण्यात आले होते
इंडियन मुजाहिदीन (IM) आणि प्रतिबंधित स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे स्फोट घडवून आणले. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी टेलिव्हिजन चॅनल आणि प्रसारमाध्यमांना 'इंडियन मुजाहिदीन'ने बॉम्बस्फोटाचा इशारा देणारा ई-मेल पाठवला होता. 2002 मधील गोध्रा दंगलीला प्रत्युत्तर म्हणून आयएमच्या दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांचे मानने होते. या प्रकरणातील आणखी एक आरोपी यासीन भटकळ याच्याविरुद्ध पोलिस नव्याने गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.