Advertisement

शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे अनुदान

प्रजापत्र | Thursday, 17/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१७ -महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने  वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला असून, याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून १०३५ कोटी १४लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड जिल्ह्यात मिळाली असून बीड जिल्ह्यासाठी १४२ कोटी ३१ लाख रुपये मदतीपोटी विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहेत. 

 

         बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणात अतिवृष्टी अनुदानाची उर्वरित २५ टक्के मदत मिळवून देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द खरा ठरला असून जिल्ह्यास सर्वाधिक १४२ कोटी ३१ लाख मदत प्राप्त झाली असून जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही श्री.मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
खरीप हंगामात पिके ऐन बहरात असताना बीड जिल्ह्यात व मराठवाड्यात पावसाने आकांडतांडव केला होता. सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलासा देण्यासाठी तब्बल १६ वेळा दौरा केला होता. 
दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

Advertisement

Advertisement