डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे. सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती.
डोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळा कामावर गेले. यावेळी घरात त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगा होता. तब्येत बरी नसल्याने सुप्रियाने शेजारी राहणाऱ्या महिलेला मुलाला शाळेत सोडण्यासाठी सांगितलं. दुपारी साडे बारा वाजता मुलगा शाळेत गेला. त्यानंतर सुप्रिया एकटीत घरी होती.संध्याकाळी किशोर कामावरुन घरी परतले, तेव्हा त्यांना घरात सुप्रिया दिसली नाही. म्हणून त्यांनीआजूबाजूला शोध घेतला, नातेवाईकांना फोन करुन विचारलं, पण तिचा कुठेच शोध लागत नव्हता. अखेर रात्रीच्या सुमारास सुप्रिया हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी किशोर मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. या दरम्यान शेजाऱ्यांना किशोर यांच्या घरातील सोफा अस्ताव्यस्त आढळला. त्यांना संशय आल्याने त्यांनी सोफा उघडला असता त्यांना जबर धक्का बसला.सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला, सुप्रियाची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढचा तपास सुरु करण्यात आला आहे. सुप्रिया हिची हत्या कोणी आणि कशासाठी केली, तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मानपाडा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं जात असून विचारपूस केली जात आहे.