Advertisement

किरीट सोमय्यांना अल्टीमेट

प्रजापत्र | Tuesday, 15/02/2022
बातमी शेअर करा

कोरोना काळात पुणे आणि मुंबईतील कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून 100 कोटींची भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यावर आता सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने किरीट सोमय्या यांनी एक नोटीस पाठवली आहे. या नोटीमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील कोरोना सेंटरमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. कोव्हिड केंद्रांचे कंत्राट मिळालेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी आक्रमक झाली असून, कंपनीने सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला असून, नोटीस प्राप्त झाल्यानंतर 24 तासात कंपनीची लेखी माफी मागावी अन्यथा कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. आमच्या कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट हे कायदेशीर प्रक्रियेने मिळाले होते. त्यामुळे कुठल्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली तरीही आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

तर तिकडे किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. कोरोना काळात कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरचे कंत्राट कोणताही अनुभव नसलेल्या आणि बनावट कंपनीला देण्यात आले. त्यामुळे कोव्हिड सेंटरमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यापैकी 30 ते 35 कोटी रुपये दिल्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, हे सर्व प्रकरण सुरू असताना लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने किरीट सोमय्या यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला असून, सोमय्या यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाई केली जाईल. असे म्हटले गेले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या माफी मागणार का? हे पाहावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement