Advertisement

उमराई येथील नरेगा गैरव्यवहारात अखेर सोमवारी सुनावणी

प्रजापत्र | Sunday, 13/02/2022
बातमी शेअर करा

 आयुक्तालयाच्या  आदेशानंतर जिल्हापरिषद लागली कामाला

बीड जिल्ह्यातील नरेगामधील घोटाळे सातत्याने चर्चेत असतानाही या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी प्रशासन कायम उदासीन असल्याचेच चित्र आहे. अंबाजोगाई तालुक्यातील उमराई ग्रामपंचायतीत नरेगामध्ये झालेल्या घोटाळ्यावर जकारवाई करण्यासाठी देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ केली जात होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे  यांच्या पाठपुराव्यानंतर थेट आयुक्तालयानेच आदेश दिल्याने या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. १४ ) मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.
बीड जिल्ह्यात नरेगामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. असाच एक गैरव्यवहार अंबाजोगाई तालुक्याच्या उमराई ग्रामपंचायतीमध्ये समोर आला. सामाजिक अंकेक्षणातून सदरचा गैरव्यवहार समोर आला असला तरी त्यावर कारवाई झालेली नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांना अनेकदा निवेदने दिली, मात्र कारवाई झालेली नाही. त्यानंतर ढवळे यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर आयुक्तालयातूनच जिल्हा परिषद प्रशासनाचे कां टोचण्यात आले. त्यानंतर आता जिहापरिषदेने या प्रकरणाची सुनावणी घेण्याच्या हालचाली सुरु केल्या असून सोमवार (दि. १४ ) रोजी या प्रकरणात सीईओ अजित पवार सुनावणी घेणार आहेत.

सीईओंची भूमिका सकारात्मक, पण घोटाळेबाजांची नको पाठराखण
बीड जिल्हा परिषदेचे सीईओ असलेल्या अजित पवार यांची एकंदरीतच काम करण्याची पद्धत आणि कामांकडे पाहण्याची भूमिका सकारात्मक आहे. मात्र त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहेत. चौकशी आणि कारवाईमध्ये कालापव्यय करण्यापेक्षा कामे मार्गी लावण्याकडे सीईओंचा कल आहे. मात्र त्यामुळे अनेक प्रकरणात कारवाया होत नाहीत. यातून घोटाळेबाजांना अभय मिळत आहे. नरेगासारख्या योजनेतून कामे झालीच पाहिजेत , ही कामे रखडू नयेत, पण हे करताना कोणी पाण्यावर लोणी काढीत असतील तर त्यांना आळा घालणे देखील महत्वाचे आहे. नरेगाच्या संवेदनशील विषयाची किंमत यापूर्वी बीडमध्येच एका आयएएस अधिकाऱ्याला त्यांची काहीच चूक नसतानाही चुकवावी लागली होती. त्याची पुनरावृत्ती जिल्हापरिषदेच्या बाबतीत होऊ नये. अजित पवारांचा सकारात्मक दृष्टिकोन चांगला आहेच, पण त्यातून घोटाळेबाजांची पाठराखण होऊ नये.

Advertisement

Advertisement