बीड - इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअरचा गुगलवरून नंबर घेऊन त्याला फोन करणे एकाला चांगलेच महागात पडले असून त्याच्या अकाऊंटमधून भामट्याने ८२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी गेवराई पोलिसात एकाने तक्रार दाखल केली आहे.
मोहम्मद नासेरोद्दीन खलिलोद्दकीन (रा. शहेंशाहनगर, बार्शी रोड बीड) या नोकरदाराने आपल्या मोबाईलवरून आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करण्यासाठी गुगलवरून नंबर घेऊन त्यांना माहिती विचारली असता समोरच्या व्यक्तीने त्यांना आपल्या मोबाईलमध्ये एनी डेस्क ऍप डाऊन्लोड करण्यास सांगितले. ते अपॅ डाऊनलोड करत त्याचा नंबर मोहम्मद नासेर यांनी समोरच्याला सांगताच त्यांच्या अकाऊंटमधून तीन वेळेस एकूण ८२ हजार ११४ रुपये कपात झाल्याचा त्यांना मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नासेरोद्दीन यांनी गेवराई ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. पेलगुळवाड करत आहेत.