बीड : आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांनी आणखी एकाला बुधवारी ताब्यात घेतले. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे त्या आरोपीचे नाव असून संजय सानप याचा तो मेव्हणा असल्याची माहिती आहे. संजय सानप याने अनेक उमेदवारांकडून पैसे घेतले होते. पुणे सायबर पोलीसांनी त्याला यापूर्वीच अटक केली आहे.
पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अॅक्टीव्हीटी अतुल राख करीत होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. आज त्याला पुण्यातुनच पोलीसांनी जेरबंद केले. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. यातील केवळ संजय शाहुराव सानप हा पोलीसांनी जेरबंद केलेला आहे. आज अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतचे आरोपी
उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 36 रा. तिंतरवणी. ता.शिरूर व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक बीड), मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग लातुरचा प्रशांत व्यंकट बडगीरे (वय 50 रा. योगेश्वरी नगरी अंबाजोगाई), मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा.एकात्मता कॉलनी यशवंतराव चौक अंबाजोगाई), नेकनूर स्त्री रुग्णालयाचा शाम महादू मस्के (रा.पंचशील नगर अंबाजोगाई), भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र पांडुरंग सानप (रा.भक्ती कंस्ट्रक्शन शामनगर बीड, मुळ गाव वडझरी ता.पाटोदा), नामदेव विक्रम करांडे (वय 33 रो हाऊस नं.3, अष्ट विनायक कॉलनी कॅनॉल रोड गयानगर बीड), संजय शाहुराव सानप (रा. वडझरी), विजय नागरगोजे, आणि आता अतुल राख (थेरला, ह.मु. अंकुशनगर बीड) यांना आतापर्यंत अटक झालेली आहे