बीड - मादळमोही येथील व्यापार्याचे अपहरण करुन त्याला मारहाण करत खंडणी मागितल्याची घटना दि.26 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सुत्रधाराच्या शोधात होते. अखेर बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेला मुख्य सुत्रधार पवार याला अटक करण्यात यश आले. त्याला चाकण येथून ताब्यात घेण्यात आले असून चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मादळमोही येथील व्यापारी कैलास शिंगटे याचे स्कॉर्पीओमधून अपहरण केल्याची घटना घडली होती. शिंगटे यांना मारहाण करत दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. शिंगटे यांच्याकडून पैसे मिळत नसल्याने अखेर त्यांना वडीगोद्री शिवारात सोडून देण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली. परंतु मुख्य आरोपी संजय उर्फ संज्या रामदास पवार हा फ रार होता. त्याच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली 5 फे ब्रुवारी रोजी एक पथक पाठविण्यात आले होते. आरोपी संजय पवार हा मागील दोन ते तीन वर्षात उस्मानाबादउ, सोलापूर, कर्नाटक राज्यातील बिदर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी वास्तव्यासअसल्याची माहिती घेत असतांना तो सध्या चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी सापळा रचून त्याला चाकण येथून स्कॉर्पीओ गाडीसह (एमएचच 06 बीएम 2477) ताब्यात घेण्यात आले. या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये गावठी कट्टा व काडतूस आढळून आले. याबाबत त्याचा भाऊ अविनाश पवार व बाळू जाधव यांनी दहा ते बारा महिन्यांपूर्वी मादळमोही येथे गावडे यांच्यावर फ ायर केला होता व नंतर माझ्याकडे आणून ठेवल्याचे सांगितले. पवार याला चकलांबा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यापूर्वीच्या 21 गुन्ह्यांमध्ये वाँटेड
खंडणी प्रकरणातील आरोपी संजय पवार याच्या विरोधात यापूर्वी बीड जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर खुनाचा प्रयत्न 1, दरोडा 3, दरोड्याची तयारी 2, जबरी चोरी 2, चोरी 7, खंडणी 1, अपहरण 2, मारामारी 1, दुखापत 1, बनावटीकरण 1 असे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांसह इतरही काही गुन्हे आता उघडकीस येऊ शकणार आहेत.