Advertisement

जावयाने सासूला फेकलं विहिरीत

प्रजापत्र | Wednesday, 09/02/2022
बातमी शेअर करा

 जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाद विकोपाला गेल्याने जावयाने टोकाचं पाऊल उचललं. जावईबापूंनी आपल्या 60 वर्षीय सासूला विहिरीत फेकल्याचं समोर आलं आहे. 80 फूट खोल विहिरीत पडल्यामुळे सासूबाईंचा मृत्यू झाला. अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी जावई फरार झाला आहे. आरोपीचा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा घाबरुन तिथून पळाला, त्यामुळे त्याचा जीव वाचल्याचं बोललं जात आहे. चिमुरड्यानेच हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. शेताची रखवाली करण्यावरुन वृद्धेचा जावयासोबत वाद झाला होता. याच कारणावरुन 35 वर्षीय जावयाने सासूचा जीव घेतल्याचा आरोप केला जात आहे. पोलीस आरोपी जावयाच शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?
अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव येथील शेतकरी संजय ढोरे यांच्या वघाडी शेत शिवारातील शेतात हा प्रकार घडला. रखवालीसाठी वास्तव्यास असलेल्या 60 वर्षीय मजूर महिलेला तिच्या जावयाने 80 फूट खोल विहिरीत फेकले. त्यात वृद्ध सासूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेतात सासू-जावयाचा वाद
शेतात रखवालीसाठी राहणाऱ्या 60 वर्षीय मजूर चंद्रकला डाखोरे आणि त्यांचा 35 वर्षीय दारुड्या जावई विलास इंगळे याचे सोमवारी रात्री काही कारणावरुन भांडण झाले. बोलता बोलता वाद विकोपाला गेला आणि जावयाने सासूला चक्क 80 फूट खोल विहिरीत ढकलले.

चिमुकल्याने कुटुंबीयांना सांगितलं
त्यावेळी आरोपीचा 2 ते 3 वर्षांचा मुलगा घाबरुन तिथून पळाला. त्यामुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला. त्या चिमुकल्याने घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. बाळापूर पोलीस जावयाचा शोध घेत आहेत.

Advertisement

Advertisement