Advertisement

काश्मीरसंदर्भातील पोस्टमुळे Hyundai वर संतापले भारतीय

प्रजापत्र | Monday, 07/02/2022
बातमी शेअर करा

भारतामधील दुसरी सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी असणारी ह्युंदाई ही वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. या कंपनीच्या पाकिस्तानमधील अकाऊंटवरुन काश्मीरसंदर्भात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने नवीन वाद निर्माण झालाय. या प्रकरणावरुन ह्युंदाईवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील मागणी करणारा ट्रेण्ड व्हायरल होऊ लागल्यानंतर आता कंपनीनच्या भारतातील व्यवस्थापनाने एक पत्रच जारी केलं आहे. “असंवेदनशील मुद्द्यांसाठी कंपनीचे धोरण हे शून्य सहिष्णुतेचं आहे,” असं कंपनीने म्हटलंय.

झालं असं की पाच फेब्रुवारी रोजी ह्युंदाई पाकिस्तानच्या सोशल मीडिया पेजवरुन काश्मीरसंदर्भात वादग्रस्त पोस्ट करण्यात आली. ‘काश्मीरमधील जनते’सोबत आम्ही त्यांच्या ‘स्वांत्र्याच्या लढ्यात’ सोबत आहोत अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आळी होती. पाकिस्तान दरवर्षी पाच फेब्रुवारीचा दिवस ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा करतो. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना समर्थन दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी कंपनीने ही वादग्रस्त पोस्ट केली होती ज्यात काश्मीरच्या दल लेकचा फोटो वापरुन वर काश्मीर हे शब्द काटेरी कुंपणामध्ये दाखवण्यात आलेले. वाद झाल्यानंतर ही पोस्ट हटवण्यात आलीय.

भारतामध्ये #BoycottHyundai हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लगला. यावर लाखो ट्विट्स पडले. अनेकांनी या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर पाकिस्तानमध्ये किती गाड्या विकल्या जातात आणि भारतात किती इथपासून ते आता ह्युंदाई हे उद्योग सुद्धा करु लागलेत असा टोला लगावलाय.

Advertisement

Advertisement