Advertisement

समान नागरी कायदा, अनुसूचित जाती संशोधन विधेयक आणि ओवेसी प्रकरण

प्रजापत्र | Sunday, 06/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.५ (प्रतिनिधी)-केंद्रातील सत्तेचा मार्ग नेहमीच उत्तरप्रदेशातून जात आलेला आहे. त्यामुळेच भाजपसाठी, त्यातही योगी आणि मोदींसाठी उत्तरप्रदेशच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. मात्र यावेळी उत्तरप्रदेशचा मूड काहीसा वेगळा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भाजपने निवडणुका हमखास जिंकण्यासाठीच धार्मिक ध्रुवीकरणाचे कार्ड खेळायला सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशात ओवेसींवर झालेला हल्ला असेल किंवा राज्यसभेत भाजप खासदाराने सादर केलेले समान नागरी कायद्याचे खाजगी विधेयक किंवा लोकसभेत सरकार केवळ उत्तरप्रदेशासाठी आणू पाहत असलेलले अनुसूचित जाती जमाती संशोधन विधेयक , हे सारे प्रकार आता भाजपची भिस्त पुन्हा एकदा धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणावरच असल्याचे सांगणारे आहेत.

 

 

उत्तरप्रदेशातील निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. एकेकाळी उत्तरप्रदेशबद्दल भाजपला मोठा विश्वास होता, मात्र आता भाजपनेच उत्तरप्रदेशची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. ज्याप्रकारे स्वामीप्रसाद मोर्यांसारखे मंत्री असलेले चेहरे आणि काही आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिट्ठी दिली ते पाहता वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे लक्षात यायला हरकत नाही . त्यामुळेच आता मोदींनी उत्तरप्रदेशाची सूत्रे पुन्हा एकदा 'भाजपची निवडणुका जिंकण्याची मशीन ' असलेल्या अमित शहांकडे दिली आहेत. आणि त्यासोबतच आता भाजपचा अजेंडा विकासवरून 'धार्मिक आणि जातीय ' ध्रुवीकरणावर येऊन पोहचला आहे. चार दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशात ओवेसींच्या वाहनावर झालेला हल्ला , शस्त्र तेथेच टाकून पळालेले आणि लगेच पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी आणि त्यानंतर आता 'मला झेड सुरक्षा नको तर ए दर्जाचे नागरिकत्व हवे आहे ' अशी ओवेसींनी केलेली घोषणा , आता कोणाचे नागरिकत्व ए द्रहजचे आणि कोणाचे दुय्यम यावर वाद सुरु व्हायला सुरुवात होणार आहेच. आणि अशा ध्रुवीकरणातून फायदा कोणाचा होतो हे काही आता लपून राहिलेले नाही.

 

 

मात्र भाजपची भिस्त काही केवळ एकावरच नाही, तर ध्रुवीकरणासाठी भाजप सर्व पर्याय खुले ठेवून आहे. त्यातूनच राज्यसभेत भाजच्या खासदारांनी 'समान नागरी कायद्याचे 'खाजगी विधेयक आणले आहे. संसदेत विरोधी पक्षातील सदस्य खाजगी विधेयक आणतात हे माहित होते, मात्र सत्तेतल्यानी खाजगी विधेयक आणणे ही सरळ सरळ चाल आहे. भाजपला करायचे काहीच नाही, मात्र या निमित्ताने वाद पेटवून द्यायचा, जमल्यास जन्मताच अंदाज घ्यायचा आणि आम्ही काही तरी करणार आहोत असा आभास निर्माण करून ध्रुवीकरण करायचे असा हा सारा खेळ आहे. त्याला जोडूनच खास उत्तरप्रदेशसाठी' अनुसूचित जाती जमाती संशोधन विधेयक ' आणले जाणार आहे. यातून अनुसूचित जातीमधील काही जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात टाकण्याचा विचार आहे. यामाध्यमातून त्या जाती समूहाला चुचकाराने हाच हेतू आहे. असेही काही दिवसांपूर्वी योगिनीं ओबीसींमधील काही जातींना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले होतेच. आता हे बविधेयक मांडण्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे मागण्यात आली आहे. अहंकारसंहितेमुळे ती मिळणार नाहीच, मात्र यातून आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करणार आहोत असे दाखवायला भाजप मोकळा .

 

 

गंगेत डुबक्या मारून, अयोध्या , वाराणसीमधील रस्ते दुरुस्त करून, किंवा लक्ष दीप उजळूनही उत्तरप्रदेश अवघड जात असल्यानेच आता भाजप त्यांच्या मूळ भूमिकेवर आणि धार्मिक, जातीय ध्रुवीकरणाच्या अजेंड्यावर आला आहे हेच उत्तरप्रदेशातील निवडणुकांचे जमिनी वास्तव आहे.

Advertisement

Advertisement