Advertisement

उमरगा (प्रतिनिधी) :  भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने पोस्टात विविध योजना राबवल्या जातात त्यात पोस्टल विमा योजना, सुकन्या योजना, पोस्टल पेमेंट बँक, डीडी, आरडी खाते अशा विविध योजना पोस्ट विभागाकडून चालवल्या जातात. मुदत ठेव योजनासारख्या योजना राबवल्या जातात. 

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपाॕझिट अकाउंट योजनेंतर्गत एक वर्षासाठी खाते उघडल्यास 5.5 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो तर 5 वर्षासाठी योजनेत वार्षिक 6.7 टक्के व्याजदर लाभ मिळतो. या योजनेत वार्षिक व्याज तिमाही आधारावर दिले जाते. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला या योजनेसाठी पोस्टात आरडीचे आपले खाते उघडून मासिक बचत करत  करतात. त्यात 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत मासिक बचत केली जाते. 
मात्र जकेकूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये  या प्रकारच्या बचतीच्या मुदत संपलेल्या रकमा पोस्ट मास्तरने परस्पर लाटल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यात बचत पुस्तिकाच्यावर पोस्टाचा फक्त शिक्का मारणे, पण रक्कम जमा न करणे मुदत संपलेल्या खातेधारकाला रक्कम देण्यासाठी ताटकळत ठेवणे, सहा- सहा महिने त्यांना वाट पाहावयास सांगणे. बदल्यात दोनशे, पाचशे रुपयांची मागणी करणे अशा तक्रारी पोस्टाच्या ग्राहकांनी वरिष्ठाकडे केल्या. त्यामुळे गावातील एकच गदारोळ माजला आहे.  गावातील नागरिकांनी आपल्या तक्रारी पोलिस ठाणे उमरगा तसेच पोस्टातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे उमरगा पोस्ट कार्यालय येथील कर्मचारी  प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी गावात उपस्थित झाले होते. पोलिसांसमोरच या प्रकरणाची शहानिशा करण्याचा प्रयत्न बुधवारी  (दि. 2) गावातील महादेव मंदिर सभागृहात चालू  होता. याकामी उमरगा येथील डाकनिरीक्षक, मेल गार्ड, कर्मचारी उपस्थित होते. ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तरे देताना पोस्टमास्तर  फक्त उडवा उडवीची उत्तरे देत होते.  2019 साली तालुक्यातील कवठा याठिकाणी असाच प्रकार समोर आला होता. त्या पोस्ट मास्तराने जवळपास 12 लाख रुपयावर डल्ला मारला होता. खातेधारकांना अजूनही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. 
जकेकूर येथील ग्रामस्थांना सुद्धा अशाच प्रकारची भीती वाटतं आहे. मोठया कष्टाने कमावलेला पैसा डाक विभागाकडून परत मिळेल की नाही याकडे खातेधारकांचे लक्ष लागले आहे. 

जाने 2017 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत एक कोटी सहा लाख 92 हजार 90 रुपये  इतकी रक्कम जमा केली आहे. मात्र त्यापैकी किती रक्कम पोस्ट मास्तराने जमा केली, याचा अद्याप हिशोब लागत नाही. याबाबत विचारणा केली असता पोस्ट मास्तर  उडवाउडवीची उत्तरे  देत आहेत. 
- निलावती बिराजदार, पोस्टल एजंट (जकेकूर) 

कागदपत्रे, पासबुक आदी रेकॉर्ड उपलब्ध झाले   नसल्यामुळे नेमका किती रुपयांचा अपहार झाला आहे हे सांगता येत नाही. मात्र हा घोटाळा उघडा झाला तर दोषींची गय केली जाणार नाही.
-सचिन स्वामी, डाक निरीक्षक - उमरगा

 

Advertisement

Advertisement