Advertisement

रुग्णांचे जादा घेतलेले पैसे परत करा नाहीतर नोंदणी करू रद्द

प्रजापत्र | Saturday, 05/02/2022
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णाकडून जादा बिल उकळल्याचे लेखापरीक्षणात समोर आले होते. अशा रुग्णालयांना जास्तीचे घेतलेले बिल रुग्णांना परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र काही रुग्णालयांनी काही पैसे परत केले तर काहींनी अजूनही परत केले नाहीत , त्यामुळे आता २ दिवसात रुग्णांना जास्तीचे पैसे परत करा अन्यथा रुग्णालयांची नोंदणी रद्द केली जाईल अशी नोटीसच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना बजावली आहे.
कोरोनाच्या काळात राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांची दर निश्चिती केली होती. तसेच खाजगी रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाच्या बिलाचे लेखापरीक्षण करून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार खाजगी रुग्णालयांनी जास्तीच्या घेतलेल्या रकमांची यादी लेखापरीक्षकांनी निश्चित केली होती. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित रुग्णालयांना जास्तीचे घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. यातील काही रुग्णालयांनी काही रुग्णांना पैसे परत केले, तर काहींनी अजूनही परत केलेले नाहीत. आता अनेक रुग्णालये रुग्णच पैसे न्यायला येत नसल्याचे सांगत आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही रुग्णांना पैसे परत न केल्याने आता जिल्हा शल्य चिकित्सकांनी अशा रुग्णालयांना नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.

रुग्णालयांनी लिहून ठेवले चेक
दरम्यान जिल्हा प्रशासनाने रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत करा असे आदेश दिल्यानंतर काही रुग्णालयांनी स्वतःच्या दवाखान्यात रुग्णाच्या नावाने चेक लिहून ठेवले आहेत. मात्र रुग्णच पैसे घ्यायला येत नसल्याचा या रुग्णालयांचा दावा आहे.

रुग्णाकडे बाकी जास्त , त्यामुळे येत नाहीत
दरम्यान याच विषयाची आणखीही एक बाजू आहे. रुग्णांना सुटी करताना रुग्णाकडे काही रक्कम बाकी आहे. आता लेखापरीक्षणामध्ये सदर रुग्णाकडून काही रक्कम जास्तीची घेतल्याचे समोर आले , तरी ती जास्तीची घेतलेली रक्कम त्याच्याकडे असलेल्या बाकीच्या तुलनेत काहीच नाही, त्यामुळे देखील हे पैसे घ्यायला रुग्ण येत नसल्याचे  खाजगी रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे.

या रुग्णालयांना बजावली  नोटीस
रुग्णालयाचे नाव                   रक्कम
दीप हॉस्पिटल बीड               ७५ हजार १५८
संजीवनी मल्टीस्पेशालिटी बीड   ६ लाख २० हजार
नवजीवन हॉस्पिटल बीड      ४६ हजार ४२०
धूत हॉस्पिटल बीड             १ लाख १७ हजार ५२८
डॉ. मोटे, आधार हॉस्पिटल गेवराई   ३१ हजार ६६०
कृष्ण हॉस्पिटल बीड                   ७ हजार
लाईफलाईन हॉस्पिटल बीड          २९ हजार ३१९
माउली हॉस्पिटल पाटोदा            ४१ हजार २००

Advertisement

Advertisement