नाशिक : पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे.नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस माहिती पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. त्यावरुन या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.