भंडारा-महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केलीय.