सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी उच्च न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. यावेळी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या सगळ्यानंतर कणकवलीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
कणकवली न्यायालयाने नितेश यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे हे कोर्टासमोर शरण आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन कसा मिळू शकतो, असा सवाल सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात उपस्थित केला होता. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. परंतु, आज नितेश राणे यांनी शरणागती पत्कारल्याने त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयात जाण्यापूर्वी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आतापर्यंत राज्य सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण आज मी स्वत:हून न्यायालयासमोर हजर होत आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे सध्या कणकवली पोलीस ठाण्यात गेले आहेत. आता पोलीस त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उच्च न्यायालयातही नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला जाण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नितेश राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर सकाळपासून वकिलांची खलबंत सुरु होती. या बैठकीत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि कायदेतज्ज्ञ उमेश सावंत हजर होते. तर सतीश मानशिंदे आणि इतर वकील मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीअंती नितेश राणे यांनी न्यायालयासमोर शरणागती पत्कारावी, असा निष्कर्ष निघाला. जेणेकरुन त्यांना जामीन मिळण्याची वाट सुकर होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. त्यानुसार नितेश राणे यांनी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले.