गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण असावं की नसावं, यावर मोठी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. ओबीसी आरक्षण नसल्यास या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी तरतूद करणारं विधेयक राज्याच्या विधिमंडळात पारीत करण्यात आलं होतं. सर्वपक्षीय पाठिंब्यावर हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा होती. राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे या विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.