Advertisement

शरद पवारांनी केली कोरोनावर मात

प्रजापत्र | Monday, 31/01/2022
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी करोनावर मात केलीय. (Sharad Pawar Tested Corona Negative) ८१ वर्षीय पवार यांनी ट्वीट स्वत:च करोना संसर्ग झाल्याची माहिती २४ जानेवारी रोजी दिली होती. त्यानंतर सात दिवसांनी म्हणजेच आज दुपारी साडेपाचच्या सुमारास पवार यांनी ट्विटरवरुन माझ्या करोना चाचणीचे निकाल नकारात्मक आल्याचं ट्विट केलंय.

 

 

शरद पवार यांनी २४ जानेवारी रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये, ”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं म्हटलं होतं. त्यानंतर पवार सात दिवस क्वारंटाइन होतं. सात दिवसांनंतर आज त्यांची करोना चाचणी नकारात्मक आली असून आपण करोनावर मात केल्याचंही त्यांनीच ट्विटरवरुन सांगितलं आहे.

 

 

“माझी करोना-१९ आरटी-पीसीआर चाचणी नाकारात्मक आली आहे. मी माझ्या सर्व डॉक्टरांचे, मित्रांचे, सहकाऱ्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानतो. मला लवकर बरं वाटावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा पाठवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं ट्विट पवार यांनी केलंय.

 

 

आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. पवारांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना करोनावर मात करुन लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच इतरही नेत्यांचा समावेश होता. शरद पवार यांनी करोनाची पहिली लस १ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतली होती त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी त्यांनी करोना प्रातिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलाय. तरीही त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता.

Advertisement

Advertisement