औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. औरंगाबाद महापालिकेची मुदत संपूनही कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. या निवडणुका कधी होणार? याबाबत स्पष्टता नाही मात्र निवडणुकीच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. औरंगाबाद शहरात सध्या एका पोस्टर्सची भलतीच चर्चा सुरु आहे. हा पोस्टर पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२ साठी तीन मुलं असलेल्या बापाने लावलेल्या एका बॅनरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही अजब आहे. औरंगाबादच्या रमेश पाटील यांनी या बॅनरच्या माध्यमातून चक्क बायको पाहिजे असा मजकूर लिहिल्याने विविध स्तरावर याबद्दल चर्चा सुरु आहे. रमेश विनायक पाटील हे महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार त्यांना याठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात उतरणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शहरात अशा आशयाचे बॅनर्स झळकावले आहेत.
काय लिहिलंय या पोस्टरमध्ये?
औरंगाबाद महापालिका निवडणूक २०२२, मला तीन मुले असल्याकारणानं मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. तिला जातीची अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहित, विधवा, घटस्फोटीत चालेल फक्त २ आपत्यपेक्षा जास्त असणारी चालणार नाही. ३५ वर्षीय रमेश विनायक पाटील यांनी या बॅनरवर त्यांचा फोन नंबरही दिला असून इच्छुक महिलेला संपर्क करण्यास सांगितले आहे.