बीड : एनी डेस्क ॲप डाऊनलोड करताच खाते रिकामे होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. बीड जिल्ह्यात आणखी दोन घटना उघडकीस आल्या असून वडवणी तालुक्यातील एक तरुण आणि बीड येथील एका शिक्षिकेला हा ॲप डाऊनलोड करायला लावून त्यांची मोठी रक्कम बँक खात्यातून काढून घेतली. या प्रकरणी वडवणी आणि बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश जाधव रा. साळिंबा, ता.वडवणी या तरुणास बजाज फायनान्सच्या ईएमआय कार्डची ऑफर असल्याच्या विपीन गुप्ता नामक व्यक्तीने दि २१ जानेवारी कॉल केला. तरुणाला विश्वासात घेऊन एनी डेस्क ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड करताच बोलण्यात गुंतवून गणेशच्या बँक खात्यातून ११ टप्प्यात तब्बल१ लाख १० हजार रुपये काढून घेतले. अशीच दुसरी घटना बीड शहरातील शिक्षिका अनिता संतराम तांदळे यांच्या बाबतीत घडली. अनिता तांदळे यांनी गुगल पे ची लिमिट वाढविण्यासाठी गुगलवरून एसबीआय कस्टमर केअरचा चुकीचा नंबर घेतला. त्यावर कॉल करताच समोरून बोलणाऱ्याच्या सांगण्यावरून ‘एनी डेस्क’ ॲप डाउनलोड केले. त्यानंतर तांदळे यांच्या खात्यातून दोन टप्प्यात ७४ हजार ६७१ रुपये लंपास केले. याप्रकरणी वडवणी आणि बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु नागरिकांनी ही कोणतेही ॲप डाऊनलोड करतांना सजग राहून व याबाबत माहिती असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी करुन मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावे. बँके बाबतीत काहीही समस्या असेलतर बँक मॅनेजरशी संपर्क साधावा असे सांगितले जात आहे.