उस्मानाबाद :- येत्या 26 जानेवारी 2022 रोजी होणारी ग्रामसभा कोरोना परिस्थितीमुळे ऑनलाइन होणार आहे. यामध्ये विविध विषय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये विशेष करून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थी यांची कायमस्वरूपी यादी तयार करण्यासाठी 2018-19 मध्ये प्रपत्र ड चे झालेले सर्वेक्षण आणि ग्रामस्तरीय समितीने केलेल्या स्थळ पाहणी अहवाल या ग्रामसभेत मांडले जाणार आहेत. या यादीवर सखोल चर्चा होऊन पात्र लाभार्थी यादी अंतिम करणे आवश्यक असल्याने यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून पात्र लाभार्थी निवड करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
ग्रामसभेत अंतिम करण्यात आलेल्या पात्र आणि अपात्र यादीस व्यापक प्रसिद्धी देण्यासंदर्भात यापूर्वीच आदेश निर्गमित केलेले आहेत. जर कोणास या यादीवर आक्षेप असतील तर ग्रामसभेनंतर 15 दिवसाचे आत गटविकास अधिकारी यांच्याकडे नोंदवण्यात यावेत.असेही कळविण्यात आले आहे.