बीड : शेतकरी आणि बैल यांचा जिव्हाळा काही औरच असतो. जणू ते एकमेकांचे सख्खे नातेवाईकच असतात. म्हणूनच बैल दगावल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याचा तेरावा करत गावजेवणाचा कार्यक्रमही केला.
कळमनुरीच्या गोळ बाजार गावातले शेतकरी सुभाषचंद्र सोनी यांचा बैल आजाराने मरण पावला. हा बैल गेल्या २५ वर्षांपासून सोनी यांच्या शेतात राबत होता. त्यातून तो जणू सोनी परिवाराचा सदस्यच बनला होता. त्याच्या मृत्यूने दु:खी झालेल्या सुभाषचंद्र सोनी यांनी त्याचा रीतीरिवाजाप्रमाणे तेरावा घातला. एखाद्या माणसाप्रमाणे बैलाची तेरावा होत असल्याने गावही चकित झालं. या निमित्त सोनी यांनी गावकऱ्यांना जेवण दिलं. बैल दगावल्याने त्यांचा मोठा आधार गेला आहे. ११/०१/२०२२ रोजी त्यांच्या सर्जा बैलाचे निधन झाले.सोनी यांच्या शेतामध्ये बैलाच्या तेराव्याचा विधी पार पडला. बैलाचा फोटोही फ्रेममध्ये लावण्यात आला. जी प्रथा रितीरिवाजाप्रमाणे मनुष्यासाठी करतो तीच प्रथा वापरुन सोनी यांनी बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.काहीजण केलेल्या उपकाराला काम झाल्यानंतर लगेच विसरुन जातात, मात्र सोनी यांनी तसे न होऊ देता २५ वर्ष आपल्या शेतात राबलेल्या सर्जाला आदरयुक्त श्रद्धांजली देत एक संदेश दिला आहे.