बीड- सिमेंटच्या बॅगची मागणी करून पैसे क्युआर कोडला पाठवून देतो असे म्हणून अज्ञात व्यक्तीने क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडत एका सिमेंट व्यापाऱ्याला ९९ हजारांना फसवणूक केल्याचा प्रकार बीड शहरामध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील सावतामाळी चौकातील एका ३७ वर्षीय सिमेंट व्यापाऱ्याला एका मोबाईल नंबरवरून फोन आला. त्याने समोरून सिमेंट बॅगची मागणी केली. पैसे क्युआर कोडला पाठवुन देतो असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच अज्ञात मोबाईल धारकाने एक क्युआर कोड पाठवुन तो स्कॅन करण्यास सांगितले. संबंधित व्यापाऱ्याने क्युआर कोड एकदा दोनदा नव्हे तर चार वेळा स्कॅन केल्यानंतर चार टप्प्यामध्ये त्यांच्या बँक खात्यातुन फोन पे द्वारे अज्ञात व्यक्तीने ९९ हजार ८९९ रूपये काढून घेत फसवणुक केली. याप्रकरणी सिमेंट डेपोच्या व्यापाऱ्याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. नि. सानप करीत आहेत.